स्वप्नांच्या मोहरण्याने


 

 

स्वप्नांच्या मोहरण्याने,
ती नवलाई बागडते
क्षितीजाच्या बंद तटाचे,
सोनेरी दार उघडते

सावरुन मन माझे, मी
दाराची चाहुल घेतो,
मग क्षितीजाच्या वाटेने,
चालतो, कधी धावतो

पोचता क्षितीजावरी, मी
उंच भरारी घेतो,
कोसळतो बाजेवरुनी,
मग भानावरती येतो

उचलतो कलेवर स्वप्नाचे,
मी उगाच थोडा रडतो,
झटकून झोप सारी, मी
पुन्हा कामाला जुंपतो

– मंगेश खैरनार

Advertisements

2013 in review


The WordPress.com stats helper monkeys prepared a 2013 annual report for this blog.

Here’s an excerpt:

A San Francisco cable car holds 60 people. This blog was viewed about 2,200 times in 2013. If it were a cable car, it would take about 37 trips to carry that many people.

Click here to see the complete report.

By मंगेश खैरनार Posted in Personal

का कुणास ठाऊक?


का कुणास ठाऊक?
चांदणं फिकट वाटतं, रंग उडाल्यासारखं
अन बरसत नाहीत मेघ, पुर्वीसारखे,
का कुणास ठाऊक? पण हे झालयं काल-परवाच.

पुर्वी मित्रांच्या मैफिलीत,
चांदणं लख-लखत मिरवायचं, रात्रभर.
मेघ भरुन आलेत की भरभरुन बरसायचेत, बेभान.
का कुणास ठाऊक? पण हे झालयं काल-परवाच.
चांदणं फिकट वाटतं, रंग उडाल्यासारखं
अन बरसत नाहीत मेघ, पुर्वीसारखे,

.

.

.

.

तु मंद पावलांच्या सप्तफेर्‍याने,
माझ्या आयुष्यात आलीस,
अनं तुझं चांदण घरभर पसरलं, लख्ख!
तुझ्या प्रेमाची ती बरसात, बेभान!
आता कळलं मला…
का चांदणं फिकट वाटतं, रंग उडाल्यासारखं
अन का बरसत नाहीत मेघ, पुर्वीसारखे.

 

दोस्ती


 

सट्याक s s s…
जेवणाच्या ताटावर बसलेला आदिल अचानक गालावर झालेल्या आघाताने कळवळून उठला.

“तुझ्या अब्बाजानला सांग गणपा येऊन गेला आणि कालच्या मटनाचा हिशेब त्याने चुकता केला म्हणा”

आदिलला काहीच कळलं नाही.

संध्याकाळी त्याचे अब्बू घरी आले तेव्हा त्याने झाला प्रकार सांगितला.

“साला गणपा माझा जिगरी दोस्त, काल त्याच्या बापाने दारुसाठी घरच्या बकरीचा बोकड विकला, मी दोस्तीखातर थोडं मटन घरी पाठवलं, यात माझं काय चुकलं?”

 

(खर खर खाजते डोक्यात)


विशालदांचं फर्मास विडंबण वाचल्यावर मलाही विडंबण पाडण्याची उबळी आली आणि सध्या गाजत असलेल्या “दुनियादारी”तलं “टिक टिक वाजते डोक्यात”च खालील विडंबण पाडलं गेलं….

खर खर खाजते डोक्यात
थरथर वाढते हातात,
कधी अति कधी कमी, खाज ही सुटते जोशात

नाही जरी फणी तरी, विंचरते केस पेनाने,
जुल्फो तले जुंए खेले, कबड्डी-खोखो प्रेमाने
खोबर्‍याचे तेल नको,
जीव अडकला जेलात
खर खर …

लट ही तु, बट ही तु,
संतूर के तुटे तार है तू,
वेणी ही तू, बुचडा तू,
काटेरी झाडाचे झुडूप तू
रोज नवी खाज तुझी, वाढते खरखर डोक्यातं,
खर खर…

आर्थिक विषमता आणि नैसर्गीक साधनसंपत्ती


बर्‍याच दिवसापासुन मनात घोळणारा एक प्रश्न येथे मांडतोय.
प्रत्येक जन्म घेणारी व्यक्ती आपल्यासोबत नैसर्गीक साधनसंपत्ती वापरण्याचा/उपभोगण्याचा अधिकार घेऊन येत असते. जर हिशोब केला, तर जगातील सार्‍या साधनसंपत्तीला लोकसंख्येने भागुन जो समभाग येईल त्यावर प्रत्येकाचा अधिकार असेल. आता जर मी टाटा किंवा बिर्ला असेन तर मी आजच्या घडीला नक्कीच मला मिळालेल्या वाट्यापेक्षा जास्त भाग उपभोगत असेल किंवा जास्त भागावर माझी मालकी असेल. आणि जर मी आर्थिक दृष्ट्या दुर्बल असेन तर मला माझ्या हक्काचा भाग मिळतच नसेल.

ही वाटणी (Distribution) योग्य आहे का?
जर योग्य आहे तर ते कोणत्या आधारावर?
जर ही वाटणी योग्य नाही तर यासाठी कुठले पर्याय असू शकतात?

कट्टा


          प्रत्येकाने आपल्यासाठी एक अशी हक्काची जागा राखून ठेवलेली असते की जिथे गेल्यावर तो स्वतःशी संवाद साधतो. तो जेव्हा निराश होतो, दु:खी होतो किंवा त्याला काही विचार करायचा असतो तेव्हा तो त्या आवडत्या कट्ट्यावर जाऊन बसतो. आता माझ्यासाठी असं ठिकाण म्हणजे आमच्या घराची गच्ची. आसपासची अनोळखी गर्दी, आपली माणसे, आपण जमा केलेल्या वस्तू, या सार्‍यांनी आपलं सभोवताल अशा विचित्र पद्धतीने गुरफटलेलं असतं की आपल्याला आपण दिसतच नाही. मग कुठून साधणार संवाद? कधीकधी हे सारं अनावर होतं आणि आपण आपोआपच जाऊन पोहोचतो त्या आपल्या कट्ट्यावर. स्वत:शी मनमुराद गप्पा मारायला.

          मग सुरुवात होते ती स्वतःच्या ओळखीपासून, जसं काही आपण स्वत:ला ओळखतच नाही. आपला आपल्याच मनात असलेला एक चेहरा समोर येतो. जशी-जशी ओळख पूर्ण होत जाते तसा-तसा चेहरा पूर्ण होत जातो. मग कळतं अरे इतके दिवस समाजात वावरणारा ‘मी’ असा दिसतो? आपल्याला आधीच वेगवेगळ्या नात्यांनी वेगवेगळी ओळख दिलेली असते. आईसाठी आपण एक छोटसं बाळ असतो जे कितीही मोठं झालं तरी तिला वाटत असतं कि तिच्याविना पुढच्याच क्षणी ते धरपडणार आहे, बाबांसाठी आपण एक कच्च मडकं असतो जे अजून जीवनाच्या विविध धक्यांनी पक्क झालेलं नाहीये, दादासाठी आपण अगदीच मुर्ख बालक असतो ज्याला कुणीही वेडं बनवून जाईल, इ. पण आपल्या कट्ट्यावर आल्यावर हे सगळे बाह्य मुखवटे गळून पडतात आणि आपल्याला ‘आपण’ दिसतो.

          मी माझ्या कट्ट्यावर आल्यावर वेगवेगळ्या विषयांवर स्वतःशी गप्पा मारतो. आणि अत्यंत आश्चर्यकारक पद्धतीने मी स्वतःशी प्रत्येक बाबतीत सहमत होतो. मित्रांशी गप्पा हाकताना मात्र हा प्रकार वेगळा असतो. तिथे जवळपास सगळेच माझ्या विचारांशी असहमत असतात किंवा मी त्यांच्या विचारांशी. म्हणूनच कि काय मी मित्रांपेक्षा माझ्या ह्या कट्ट्यावर जास्त रमतो. इथे मला उगाच कसला आव आणायची गरज नसते. इथे ‘मी’ अत्यंत नितळ स्वरूपातला ‘मी’ असतो.

          कधीकधी ह्या कट्ट्यावर गेल्या आयूष्याचा मागोवाही घेतला जातो. किती माणसे आपल्याला भेटली? किती सोडून गेलीत आणि कितीतरी अजूनही काही घट्ट अनुबंधांनी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. कुणाला आपण दुखावले, कुणी आपल्याला दुखावले, सगळं सगळं बाहेर येतं. आपण केलेल्या चूका आपल्याला कळतात. आपण मिळवलेलं यश आठवतं आणि आपल्या पदरी पडलेलं अपयशही. मग या सगळ्या गोष्टींच पृथक्करण होऊन एक ‘अहवाल’ आपल्या समोर सादर होतो आणि तो म्हणजे ‘अनुभव’. मला नेहमी वाटतं आलय की आपण गेल्या आयुष्यात ज्या घटना जगलोय त्यांचा ‘अनुभव’ होण्याकरता आपला स्वतःशी संवाद होणं खुप आवश्यक असतं.

          मला माझा कट्टा असं भरभरुन देतो आणि मी दोन्ही हात पसरुन ते घेत जातो. असा हा माझा गच्चीरुपी कट्टा माझा जिवलग आहे. पण आमच्या वाडीतल्या हिरवे काकांना त्यांचा कट्टा कोणता आहे असे विचारल्यावर ते म्हणतात, “पिंपळाचं झाड”. मस्त दाट सावलीत थंडगार हवेत ते ‘तिला’ घेऊन पिंपळाच्या झाडावर बसतात. आता येथे गैरसमज नको म्हणून सांगतो, ‘ति’ म्हणजे ५ रुपयात भरभरुन मिळणारी ‘गावठी’. जेव्हा-जेव्हा हिरवे काकाचं हिरवे काकूंशी भांडण होतं तेव्हा-तेव्हा ते त्या पिंपळाच्या झाडावर जाऊन बसतात. आणि यथेच्छ शिव्या हासडत ‘ति’चा लुफ्त उठवतात. संध्याकाळी जेव्हा ते घरी परतात तेव्हा ते पुन्हा रिचार्ज झालेले असतात, नव्या भांडणासाठी. 🙂

          तुमच्याकडेही असा कट्टा असेल तर जरुर सांगा. तुमचाही कट्टा तुम्हाला रिचार्ज करतो का? कि तुम्ही वहावत जाता जुन्या आठवणींकडे? काय होतं तुमच्या कट्ट्यावर?

          नक्की कळवा.

– मंगेश खैरनार

मी जिवंत आहे


सारे विवाद टाळून,
मी आपला अलिप्त,
म्हणतो फुशारकीने,
मी तटस्थ आहे

संवाद ना कुणाशी,
मी नेहमीच मुक,
म्हणतो फुशारकीने,
चिंतन करतो आहे

चिडलो ना कधीही,
मी नेहमीच शांत,
म्हणतो फुशारकीने,
माफ केलं आहे

सारे लढून मेले,
मी नेहमी निशस्र
म्हणतो फुशारकीने,
मी जिवंत आहे

– मंगेश खैरनार

मन


मन तरुण तरुण,
उंच नभात शिरुन,
घेई भरारी उत्तुंग,
जणू आकाशी विहंग

मन पाकळी पाकळी,
भावनांची साखळी,
होता आठव-साठव,
भासे बहुरंगी ताटव

मन सारंगी सारंगी,
सूर तिचे सप्तरंगी,
कुणी छेडता तार,
प्रेम-संगीत अलवार

मन पाऊस पाऊस,
धारे धारेत जल्लोश
चिंब भिजून अंतर,
तव अंकुरे विचार

2012 in review


The WordPress.com stats helper monkeys prepared a 2012 annual report for this blog.

Here’s an excerpt:

600 people reached the top of Mt. Everest in 2012. This blog got about 2,400 views in 2012. If every person who reached the top of Mt. Everest viewed this blog, it would have taken 4 years to get that many views.

Click here to see the complete report.

By मंगेश खैरनार Posted in Personal